- प्रवीण खेते
अकोला : राज्यात आतापर्यंत कोविडच्या दोन लाटा येऊन गेल्यात. यादरम्यान राज्यातील १ लाख ३६ हजार ६७ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला, तर सुमारे ३ हजार ५०१ कोविड रुग्णांना इतर कारणांमुळे जीव गमवावा लागला. विदर्भात अशा रुग्णांची संख्या कमी असून, बहुतांश रुग्णांचा जीव हा कोविडनेच घेतल्याची आकडेवारी एकात्मक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालातून समोर आली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गंभीर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. यातील बहुतांश रुग्णांना जीव गमवावा लागला होता. मृतकांमध्ये बहुतांश मृत्यू हे कोरोनामुळेच झाले होते. मात्र, काही कोविडच्या रुग्णांचा मृत्यू हा इतर कारणांनीसुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याचे निष्पन्न झाले. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पण इतर कारणांनी मृत्यू झाल्याचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने विदर्भात कमी आहे. मात्र वर्धा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांत कोविडव्यतिरिक्त इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
...अशी आहे विदर्भाची स्थिती
जिल्हा - कोविडमुळे झालेले मृत्यू - इतर कारणांनी झालेले मृत्यू
अमरावती - १५९८ - २
अकोला - १४२४ - ४
वाशिम - ६३४ - ३
बुलडाणा - ७७९ - ६
यवतमाळ - १७९८ - ४
नागपूर - ९१०६ - ७१
वर्धा - १२१६ - १६५
भंडारा - ११२२ - १०
गोंदिया - ५७१ - ७
चंद्रपूर - १६१८ - ४
गडचिरोली - ६७७ - ३२