अकोला : पीक संरक्षण व सर्वेक्षण केंद्राने (क्रॉपसॅप) विदर्भातील शेतांचे सर्वेक्षण केले असून, या सर्वेक्षणात पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत कापसावर मोठय़ा प्रमाणात फुलकिडे तर सोयाबीनवर चक्रभुंगा, उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात क्रॉपसॅप प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे खरीप पिकावरील किडींचा अभ्यास करण्यात येत असून, त्याकरिता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पिकांवर कीड, रोग, अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांचा नायनाट करण्यासाठी शेतकर्यांना योग्य कीटकनाशके वापरण्यासंबंधीचा सल्ला देण्यात येत आहे. यंदा पेरणीनंतर पावसाने दीर्घ दडी मारल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ांत कापूस पिकावर फुलकिडींचा प्रादुर्भात आढळून आला आहे. सोयाबीनवरही चक्रभुंगा, उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच हलक्या जमिनीत सोयाबीन पिवळे झाल्याचे आढळून आले आहे. या पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आढळून आली आहेत. सोयाबीनला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्याने पाने पिवळी पडल्याचे सर्वेक्षणानंतर केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळून आले; तथापि याला पिवळा मोझ्ॉक विषाणू समजून शेतकरी बुरशीनाशकांची व कीटकनाशकांची फवरणी करीत आहेत; परंतु ते उपयुक्त ठरत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कीड, अळी कि ंवा पिकांवर अशी विकृती दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
विदर्भात क्रॉपसॅपचे सर्वेक्षण!
By admin | Published: August 10, 2015 11:03 PM