अकोला : पावसाचा दीर्घकालीन खंड, अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी, यामुळे पिकांची वाढ व उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे. विदर्भात या तंत्राव्दारे हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांची प्रयोगशीलतेकडे वाटचाल सुरू आहे.
अनेकानेक वर्षांपासून विदर्भातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी करीत आहे. या पद्धतीत लागवड खर्च वाढत असून उत्पन्न मात्र कमी होत आहे. यातच अवेळी पाऊस, तापमानात बदल यामुळे पिकांवर परिणाम होत आहे. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अलीकडे रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) प्रचलित होत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात या पद्धतीने पेरणी करण्यात वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी करीत आहे. या पद्धतीमुळे चांगले उत्पादनही हाती लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
विभागात सोयाबीन क्षेत्र
१४,९९,५९० हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र
१४,५०,००५
तंत्राचे फायदे
या पद्धतीत सोयाबीनच्या ३ अथवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात, मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
बीबीएफ तंत्राव्दारे पेरणी केल्यास २० टक्के उत्पन्नात वाढ, ८ किलो प्रती एकर बियाण्यांची बचत होते. चार दात्यांचे यंत्र पेरणीच्या दृष्टीने अतिशय चांगले व योग्य आहे. गादी वाफ्याचा योग्य परिणाम साधावयाचा असेल व जमिनीत पाणी जिरवायचे असेल तर हे तंत्र योग्य आहे. शिवाय अधिकचे पाणी सरीद्वारे निघूनही जाते.
- डॉ. शैलेश ठाकरे, विभाग प्रमुख, कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला