ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १४ - पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अकोल्यात पोलीस लॉन उभारण्याची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात देखील उतरविली. अकोल्यातील राणीसती धाम मंदिरासमोरील १ लाख ६ हजार चौरस फूट जागेमध्ये भव्य पोलीस लॉन साकारण्यात येत आहे. लॉनचे ७५ टक्के काम पुर्ण झाले आहे.
पोलीस प्रशासनाला कार्यक्रम, बैठकीसाठी नेहमी इतरांना विनवणी करावी लागते. सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा असल्यास अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना मुलामुलींचे लग्न, वाढदिवस समारंभासाठी लाखो रूपये मोजून मंगल कार्यालय, लॉन भाड्याने घ्यावे लागते.
या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस लॉन उभारण्याची संकल्पना मांडली. परंतु पोलीस उभारण्यासाठी १ कोटी रूपये निधीची गरज होती. एवढी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न निर्माण झाला. पोलीस अधीक्षक मीणा यांनी अकोल्यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ९0 लाख रूपयांची निधी उभारला.
जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील व्यापारी, नागरिकांनी निधीसाठी योगदान दिले. हा निधी पोलीस कल्याण फंडामध्ये जमा करण्यात आला. आता पोलीस कल्याण फंडामधून पोलीस लॉनचे काम सुरू करण्यात आले आहे. १ लाख ६ हजार चौरस फूट जागेमध्ये १ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
जागेमध्ये प्रत्येकी २५ हजार चौरस फूटाचे दोन हिरवेगार लॉन तयार करण्यात आले आहेत. तसेच जागेमध्ये ५ हजार चौरस फूटाचे प्रशस्त टीनशेड उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात पोलीस लॉन उभारण्याचे काम जलदगती सुरू आहे. डिसेंबरअखेर पोलीस लॉनचे काम पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे.
पोलीस लॉनवर २४ वाताकूलन खोल्या
पोलीस लॉनच्या पाठीमागील जागेमध्ये प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये २४ वाताकूलन खोल्या उभारण्यात येत आहेत. खोल्या उभारणीचे ७0 टक्के काम पूर्ण झाले आहेत. लॉनवरील सांडपाण्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था करण्यात आली. यासोबतच महिला-पुरूषांसाठी स्वच्छतागृह, १ हजार नागरीकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था, चिमुकल्या मुलांसाठी प्ले एरिया तयार करण्याचे सुरू आहे.