- नितीन गव्हाळे
अकोला: अमरावती विभागात विदर्भ मुख्याध्यापक संघ कार्यरत आहे. या संघटनेचे ३ हजारावर सदस्य आहेत. दरवर्षी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विदर्भ मुख्याध्यापक संघ कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देत नाही. यंदाही तीच भूमिका विदर्भ मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. आतापर्यंत अनेक उमेदवारांनी विदर्भ मुख्याध्यापक संघाकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यात कोणालाच यश मिळाले नाही.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नानाप्रकारे प्रयत्न करीत आहेत. अमरावती विभागात साडेतीन हजार एवढी मुख्याध्यापकांची संख्या आहे. त्यामुळे शिक्षक आमदार ठरविण्यासाठी मुख्याध्यापकांची मते निर्णायक ठरणार आहेत. ही मते मिळविण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत. मुख्याध्यापकांची संघटना असल्याने, त्यांची मते कोण्या उमेदवाराच्या पारड्यात पडतात, त्यावर त्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणूक १ डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांचे उमेदवार ताकदीने प्रचार करीत आहेत. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक फंडे वापरत आहे. सध्या अकोला जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून उमेदवारांकडून शिक्षकांसाठी जेवणावळी, पार्ट्या आयोजित करण्यात येत आहेत. गुप्त ठिकाणी जेवणावळी, सभा घेण्यात येत आहेत. अमरावती विभागात साडेतीन हजार मुख्याध्यापकांची संख्या आहे. त्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच उमेदवार कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमिषे दाखविली जात आहे; परंतु अद्यापपर्यंत विदर्भ मुख्याध्यापक संघटनेने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. तो मिळविण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न होत आहेत. मुख्याध्यापकांची मते मिळाली तर निवडणुकीत उमेदवाराला चांगला आधार मिळू शकतो, याची जाणीव उमेदवारांना आहे; परंतु मुख्याध्यापक संघटनेने सध्या तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. मुख्याध्यापक संघटनेचे काही पदाधिकारीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून नशीब आजमावत असल्यामुळे मुख्याध्यापक संघटनेने काेणतीही भूमिका घेतलेली नाही.
दर निवडणुकीत विदर्भ मुख्याध्यापक संघ कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देत नाही. आमचे पदाधिकारीसुद्धा उमेदवार म्हणून निवडणूक लढवितात. त्यामुळे संघटना कोणत्याच उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. निवडणुकीत मुख्याध्यापकच त्यांचे मत कोणाला द्यायचे, हे ठरवितात.
- शत्रुघ्न बिरकड, अध्यक्ष विदर्भ मुख्याध्यापक संघ