अकोला, दि. २0 : मराठवाडा व विदर्भातील काही भागात बुधवारी व गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. येत्या २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.सव्वा महिन्याची विश्रांती घेतल्यानंतर मागील आठ दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळत असून, येत्या २४ सप्टेंबरपर्यंंंत हा पाऊस असेल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने खरीप हंगामातील काही पिकांना जीवदान दिले असून, हा पाऊस असाच अधून-मधून आल्यास रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार आहे. सध्या तरी पावसाचा अंदाज असल्याने शेतकर्यांनी मूग, उडीद काढलेल्या क्षेत्रावर रब्बीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, २१ ते २४ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असून, २१ सप्टेंबरला विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर कोकण-गोवा मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबर विदर्भ - मराठवाड्यातील काही भागात मुसळधार, कोकण-गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २३ सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २४ सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मागील चोविस तासात सकाळी ८.३0 वाजतापर्यंंंत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. पावसाची शक्यता बघता काढणीला आलेल्या सोयाबीनची शेतकर्यांना काळजी लागली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 2:12 AM