अकोला : विदर्भात येत्या २८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य आणि पश्चिम मध्य भागात चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भात बुधवारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने या भागातील शेतकर्यांच्या पावसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या अंदाजानुसार विदर्भात गुरुवारपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दोन दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे; परंतु पश्चिम विदर्भात तापमानाचा पारा ३३ ते ३४ डिग्री सेल्सिअसने वाढल्याने उकाडा वाढला असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरात २६ ते ३0 ऑगस्टपर्यंत पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता !
By admin | Published: August 26, 2015 1:01 AM