ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यामध्ये २0१२-१३ पासून शासनाने ५00 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी राज्यभर प्रयत्नही होत आहेत; परंतू पश्चिम विदर्भात जिवंत वृक्षांचे प्रमाण वर्षाकाठी २0 ते २५ लाखाने घसरत असून, वृक्षसंवर्धनाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. राज्यात वनाच्छादीत क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २0 टक्क्यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे; परंतु दिवसेंदिवस अवैध वृक्षतोड वाढत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी पावसाची अनियमीतता, ग्रामीण व शहरी भागात वायू, ध्वनी व जलप्रदूषणाची तिव्रता वाढणे यासारखी भयावह संकटं उभी ठाकली आहेत. अशा संकटांना आळा घालण्यासाठी, तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने २0१२-१३ पासून पाच वर्षांकरीता ५00 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय २0११ साली घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आले होते, ते उद्दिष्ट साध्य करताना वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्षच होत गेले. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये सन २0१२-१३ मध्ये ८७ लाख झाडे जिवंत होती. सन २0१३-१४ मध्ये जिवंत झाडांचे प्रमाण सुमारे २७ लाखांनी कमी झाले. २0१४-१५ मध्ये पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण २३ लाखांनी घटले. सलग तीन वर्षे जिवंत झाडांचे प्रमाण घटल्याने, वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
*वृक्ष लागवडीचे प्रमाणही कमीच!
विभागीय महसूल आयुक्तांच्या अहवालानुसार वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागात २0१२-१३ मध्ये १ कोटी ४४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. सन २0१३-१४ मध्ये १ कोटी १७ लाख वृक्ष लागवड झाली. २0१४-१५ मध्ये केवळ ५१ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामुळे वृक्षसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवडीचे प्रमाणही पश्चिम विदर्भात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.