अकोला: रंगमंच व ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत अखिल भारतीय संघटन, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताच्या वतीने अकोला येथे कला साधक संगम आयोजित केला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शनिवार, दिनांक, २९ व रविवार, दिनांक ३० जुलै २०२३ रोजी अकोल्यातील खंडेलवाल भवनात होत असलेल्या या कलासाधक संगमचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, मुंबई यांच्या हस्ते होईल.
संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताध्यक्ष सूरमणी कमल भोंडे (अमरावती) यांच्या अध्यक्षतेत हा उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक २९ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असून यावेळी संस्कार भारतीच्या नागपूर महानगर अध्यक्ष कांचन नितीन गडकरी, राष्ट्रीय मंत्री रवींद्र बेडेकर (नाशिक), पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, सहप्रमुख अजय देशपांडे, स्वागताध्यक्ष गोपाल खंडेलवाल, अ.भा. साहित्य विधा संयोजक आशुतोष अडोणी, प्रांत कार्याध्यक्ष सुधाकर अंबुसकर व प्रांत महामंत्री विवेक कवठेकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात युवकांसाठी आयोजित रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात येईल.
उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच चित्र व छायाचित्र तसेच पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विदर्भातील कलावंतांच्या कृती या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळतील. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता ''शिवकल्याण राजा'' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याच्या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात विदर्भातील संगीत व नृत्य क्षेत्रातील दिग्गज कलावंत सहभागी होत आहेत. द्विदिवसीय कार्यक्रमात रविवारी, ३० जुलै रोजी प्रात:कालीन संगीत सभा, प्राचीन कला अभ्यासक प्रवीण योगी यांचे ''मंदिरशिल्पांतून संस्कृतीदर्शन'', प्रा. आलोक शेवडे यांचे ''जाॅय ॲट फिंगरटिप्स'' अर्थात कीटक विश्वदर्शन उपस्थितांना घडणार आहे तसेच विदर्भातील ११ जिल्हे व ४ महानगरांतील कलासाधकांचे विविध कलादर्शन पहायला मिळेल. रविवारी दुपारी ४ वाजता समारोप होईल.
विदर्भ व अकोल्यातील कलारसिकांनी कलासाधक संगम उद्घाटन सोहळा व शिवकल्याण राजा कार्यक्रमास उपस्थित राहून तसेच कलाप्रदर्शनीस भेट देऊन आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्कार भारतीच्या अकोला महानगर अध्यक्ष चंदा जयस्वाल, मंत्री नाना भडके, प्रांत मंत्री निनाद कुळकर्णी, समन्वयक अशोक ढेरे, सहसमन्वयक चैतन्य नळकांडे व नंदकिशोर शेगोकार यांनी केले आहे.