अकोला : विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी विकासात्मक मुद्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाने स्वत: पुढाकार न घेता एका स्थानिक महाविद्यालयाचा दर्जा वाढविण्यासाठी, त्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजनात सहयोगी म्हणून दुय्यम भूमिका घेणे, ही एक प्रकारे विदर्भ विकास मंडळाची अधोगतीच आहे, असा आरोप विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी केला आहे.नागपूर येथील सी.पी. अॅॅन्ड बेरार महाविद्यालयाने विदर्भ विकास मंडळ आणि रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशनच्या सहकार्याने ४ फेब्रुवारी रोजी ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सामाजिक चळवळींची प्रासंगिकता’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. अशा प्रकारची परिषद आयोजित करण्याची कल्पना विदर्भ विकास मंडळाला स्वत:हून सुचायला हवी; परंतु तसे होत नाही. मंडळाचे सदस्य आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही डॉ. खडक्कार यांनी केला आहे.विदर्भातला मागासलेपणाच्या गर्तेतूून बाहेर काढण्यासाठी राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अंतर्गत राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. नंतरच्या काळात विदर्भ विकास मंडळ असे नामांतरण करण्यात आले. अध्यक्ष, सदस्य सचिव, पाच तज्ज्ञ सदस्य, आमदार, राज्य नियोजन आयोगाचे सदस्य आणि अमरावती व नागपूर विभागीय आयुक्त अशी या मंडळाची रचना आहे. विकासात्मक मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी या मंडळाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी मिळतो. मंडळात अंतर्भाव असलेल्यांनी स्वत: अशा प्रकारचा अभ्यास करून, शासनाला अहवाल सादर करावा, असे अपेक्षित आहे. यापूर्वी हीच पद्धत होती. तथापि, अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली असून, विकासात्मक मुद्यांचा अभ्यास करण्याची कामे मंडळ स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून करून घेत असल्याचा आरोप खडक्कार यांनी केला आहे.वर्ष २०११ पूर्वी दिवंगत अॅॅड. किंमतकर, डॉ. उलेमाले, शेणोलीकर यांच्यासारखे तज्ज्ञ सदस्य स्वत: विविध मुद्यांचा अभ्यास करून विकासात्मक अहवाल तयार करत होते. विशिष्ट क्षेत्रात पारंगत असलेल्या तज्ज्ञांची उपसमिती गठित करून हे अहवाल तयार केले जात होते. आता मात्र तसे होताना दिसत नाही. वर्षाचे २ कोटी रुपये अनुदान घेणाऱ्या मंडळाकडून असा प्रकार घडने ही दुर्दैवी बाब आहे, असेही डॉ. खडक्कार यांनी म्हटले आहे. विदर्भ विकास मंडळाने केवळ नॉलेज पार्टनर म्हणून या कार्यक्रमात आपला सहभाग घेतला आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारे निधीचा किंवा अधिकारांचा गैरवापर केलेला नाही. विदर्भाच्या प्रश्नांच्या बाबतीत मंडळ तज्ज्ञांशी चर्चा करून तसेच संशोधन करून अहवाल तयार केले जाणे ही नियमित प्रक्रिया आहे. एखाद्या कार्यक्रमावरून मंडळाचे सदस्य पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप तथ्यहीन आहे.- चैनसुख संचेती, माजी आमदार तथा अध्यक्ष विदर्भ विकास मंडळ