- संजय खांडेकरअकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे. काळ्या मातीच्या प्रदेशात सॉईल स्टॅबिलाइझेशनचा प्रयोग वरदान ठरण्याची शक्यता असल्याने अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड मार्ग निर्मितीसाठी ही पद्धत अवलंबिली जात आहे. या मार्गावरील सदर प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात याच पद्धतीने विदर्भात मार्ग निर्मिती होण्याचे संकेत आहेत.ज्या प्रदेशात काळी माती आहे, अशा ठिकाणचे रस्ते निर्मितीमध्ये रस्त्यांचा पाया (बेस) तयार करण्यासाठी खडीकरणाच्या विविध स्तरासाठी मोठा खर्च लागतो. विदर्भात शक्यतोवर काळी माती असल्याने एक मीटरपर्यंत खोल खोदकाम करून खडीकरणाद्वारे बेस तयार केले जातो. एवढे करूनही अनेक रस्ते उंच-सखल होतात. त्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकसित सॉईल स्टॅबिलाइझेशनचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने माती स्थिरीकरण करीत गरम आणि थंड अशा दोन्ही प्रक्रियेचा वापर करून काँक्रिटबेड तयार केला जातो व त्यावर डांबरीकरण केले जाते. अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड मार्ग निर्मितीसाठी प्रथमच ही पद्धती राबविली गेली. दिल्ली येथील काबा अॅण्ड देशमुख कंपनीने हे काम सुरू केले आहे. सॉईल स्टॅबिलाइझेशनसाठी वापरण्यात येणारी यांत्रिक वाहनाची किंमतच तीन कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काय आहे ‘सॉईल स्टॅबिलाइझेशन’वीज प्रकल्पातील वेस्टेज (अॅश) राख, सिमेंट, गिट्टी, मुरूम आणि डांबरीकरणाचा उकरलेला मलबा, एकत्रीतरित्या एका विशिष्ट तापमानात यांत्रिक वाहनात मिसळविले जाते. या मिश्रित मलब्याचा विशिष्ट थर मार्ग निर्मितीच्या फाउंडेशनसाठी वापरला जातो. त्यामुळे काळी माती खाली दबत नाही. त्यानंतर डांबरीकरण केले जाते. सॉईल स्टॅबिलाइझेशन पद्धतीत चुना अस्तित्वात असलेल्या मातीत सुधारणा होते. सोबतच सिमेंट मिश्रणामुळे मजबुती येते. मातीचे मजबुतीकरण, जसे की रस्ते, पार्किंगची जागा, औद्योगिक सुविधा, विमानतळे, बंदर किंवा ट्रॅक बेड तयार करण्यासाठी ही पद्धती महत्त्वपूर्ण ठरली आहे. लखनऊजवळच्या कनोजमध्ये ‘सॉईल स्टॅबिलाइझेशन’चा पहिला प्रयोग यशस्वी झाला. केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी १६ राज्यांतील तज्ज्ञ अभियंता यांना कनोज येथे बोलावून या पद्धतीचा अवलंब करण्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात काही ठिकाणी हा प्रयोग सुरू असला तरी विदर्भात प्रथमच हा प्रयोग अकोल्यात होत आहे.-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला.