- राजेश शेगोकार
अकोला : शिवसंग्रामने महायुतीमध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशीम मधील रिसोड या मतदारसंघावर दावा करून तशी मोर्चेबांधणीही केली मात्र या दोन्ही जागांवर शिवसेनेने प्रबळ दावा केला असल्याने या दोन्ही जागा सेनेच्या वाटयाला जाण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही जागा सेनेला मिळाल्या तर शिवसंग्रामची विदर्भात कोरी पाटी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महिनाभरात लागोपाठ दोन वेळा बाळापूर व रिसोडचा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांना या दोन्ही जागा आपल्याच असा विश्वास दिला होता. त्यामुळे शिवसंग्रामने या मतदारसंघात तयारीही सुरू केली. बाळापूरात शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील तर रिसोडमध्ये विष्णुपंत भुतेकर व प्रमोद गोळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. दरम्यान युतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत मित्रपक्षांना अवघ्या १३ ते १८ जागा सोडणार असल्याचे समोर आले, त्यामुळे शिवसंग्रामने केलेल्या १२ जागांच्या मागणी ची भविष्य धुसर झाले होते. यामध्ये विदर्भातील जागांवर पाणी सोडण्याची तयारी आता शिवसंग्रामला करावी लागेल असे संकेत आहेत. शिवसंग्रामला गेल्या विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व बाळापूरात ऐनवेळी शिवसंग्राम ऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. हे विशेष