राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ - दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू केले आहे. वाशिम जिल्हयातील बालखेडा येथील शेतकरी बचत गटाने (शेतकरी कंपनी )विविध पिकांचे २,५०० क्विंटल बियाणे निर्मिती केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शेतकरी शिवार फेरीत ही बियाणे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. शेतक-यांचा या बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच दर्जेदार बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मागीलवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविला होता. विदर्भातील शेतकरी गटांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बचत गटांनी खरीप पिकांचे बियाणे यावर्षी त्यांच्या शेतावरच निर्माण केले आहे. बालखेडा (ता.रिसोड,जि.वाशिम) येथील श्री. बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळाने रब्बी हंगामासाठी २ हजार क्विंटल ‘जॅकी’ हरबरा बियाण्यांचे बिजोत्पादन घेतले आहे. यामध्ये १,५०० क्विंटल पायाभूत तर ५०० क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा समावेश आहे. ५०० क्विंटल रब्बी ज्वारी तर ३० क्विंटल रब्बी गव्हाचे पायाभूत बियाण्याचेही बिजोत्पादन घेण्यात आले आहे.
राज्यातील शेतकरी गटाचे संघात रू पांतर करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी व्यावसायिक विकास आराखड्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी भांडवल उभारणी करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी आता बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्या कंपन्यांनी या पद्धतीने नियोजन केले असून, खेडे गाव व शहर असे दोन भाग पाडले आहेत. खेडे गावात शेतमाल गोळा करायचा आणि तो शहरात विकायचा, यासाठी दोन वेगवेगळी केंद्रं तयार करण्यात आली आहेत. तसेच कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या समन्वयातून ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ उभे केले जात आहे.
- खरीप बिजोत्पादन कार्यक्रमानंत रब्बी पिकांचे बिजोत्पादन घेण्यात आले आहे. रब्बी हंगामात विदर्भात हरबरा पीक अधिक घेतले जात असल्याने दर्जेदार हरबरा बियाणे निर्माण करण्यात आले आहेत.शेतकºयांचा बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.
शे.महमूद, व्यवस्थापक, श्री.बालनाथ कृषी विज्ञान मंडळ, बालखेड, वाशिम.