अकोला : कारागृहामध्ये असलेल्या महत्त्वाच्या घटनांमधील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येते. परंतु आता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कारागृह न्यायालयाशी जोडल्या जाणार असल्याने आरोपींना न्यायालयात हजर न करताच, कारागृहातूनच थेट व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून आरोपींबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. शासनाने अनेक विभाग व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जोडून कामकाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात अनेक गंभीर गुन्हय़ांमधील आरोपी बंदिस्त आहेत. आरोपींना अनेकदा न्यायालयात हजर केले जाते. यावेळी आरोपीचे नातेवाईक व सर्मथक न्यायालय परिसरात गोळा होतात. आरोपींना खाद्यपदार्थ पुरविणे, त्यांच्याशी संवाद साधणे, आदी प्रकार केले जातात. बर्याचदा आरोपींवर हल्ल्याचादेखील प्रयत्न केला जातो. अकोला जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दगडफेकीच्या, आरोपीवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच कारागृह प्रशासनाने कारागृहामध्ये ४४ इंचीचा एलक्ष्डी लावून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गंभीर गुन्हय़ांमधील आरोपींना न्यायालयात हजर न करताच, त्यांना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येईल. वाद, युक्तिवाद आरोपीचे विधिज्ञ व सरकारी विधिज्ञ हे न्यायालयात करतील आणि न्यायालय आरोपीबाबत निर्णय देईल. व्हिडीओ कॉन्फरन्सची कारागृहात सोय उपलब्ध झाल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे पोलिसांचे श्रम, पैसा, वेळ आणि वाहनांचा खर्चाची बचत होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मनुष्यबळाअभावी आरोपींना न्यायालयात हजर करताना अडचणी येत असल्याचे स्पष्ट करून आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागते. आरोपींना ने-आण करणे ही मोठी जबाबदारी असते. शासनाकडून कारागृहामध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगसाठी एलक्ष्डी उपलब्ध झाला आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगची सोय कारागृहात उपलब्ध झाल्याने गंभीर स्वरूपातील आरोपींना न्यायालयात नेण्याचे श्रम वाचतील, असे स्पष्ट केले.
व्हिडीओ कॉन्फरसिंगने कारागृह जोडणार न्यायालयाशी!
By admin | Published: July 13, 2015 1:55 AM