अतुल जयस्वाल/ ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 26 - जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरचा देशातील पहिला ‘काँक्रिट’ पूल ८९ वर्षे जुना असून, काळाच्या ओघात व नदीच्या पुराचे तडाखे सहन केल्याने हा पूल जीर्ण झाला आहे. अकोला ते आकोट मार्गावर असलेल्या या पुलावरून दररोज शेकडो वाहने जात असल्याने या पुलावर मोठा भार असतो. हा पूल मुदतबाह्य झाला असून, पुलाला आधार देणा-या गावाकडच्या दिशेला असलेल्या भरावाला खिंडार पडले आहे. यामुळे हा पूल कमकुवत झाला असून, एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य प्रदेशातील हरिसाल व आंध्र प्रदेशातील हैदराबाद या दोन शहरांना जोडणारा मार्ग अकोला जिल्ह्यातून जातो. आकोट ते अकोलादरम्यान असलेल्या गांधीग्राम येथून वाहणा-या पूर्णा नदीवर तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या अमदानीत बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन १८ जुलै १९२७ रोजी मॉटेंग्यू बटलर या ब्रिटीश अधिकाºयाच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत हा पूल पुर्णा नदीत उभा आहे. या पुलाची उंची सहा मीटर असून, त्याला १५ मीटरचे आठ गाळे आहेत. तब्बल ९० वर्षांचे वय झालेल्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जवळचा दुवा असलेला हा पूल आता मुदतबाह्य झाला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. सलग दोन ते तीन दिवस या पुलावर १५ ते २० फूट पाणी असते. एवढ्या वर्षांपासून पुराचे तडाखे सहन केलेला हा पूल कवकुवत झाला आहे. या पुलाची मुदतही संपली आहे. त्यामुळे गांधीग्राम येथून जवळच असलेल्या गोपालखेड या गावानजीक पुर्णा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. सदर पुलाचे काम पूर्णत्वास जात असले, तरी अजून किमान वर्षभर तरी त्यावरून वाहतूक सुरू होऊ शकत नाही.
२५० पेक्षाही अधिक पुराचे तडाखे
या पुलाच्या निर्मितीला ८९ वर्षे पुर्ण झाली आहेत. निर्मितीपासून आतापर्यंत या पुलाने २५० पेक्षाही अधिक पुराचे तडाखे सहन केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पुर्णा नदीला दोन ते तीन मोठे पुर येतात. पुराचे पाणी दोन-दोन दिवस पुलावरून वाहते. पुराचे एवढे तडाखे सहन केल्यामुळे हा पुल आता जिर्ण झाला आहे.