प्रवीण ठाकरे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ५ - शहराच्या मध्यभागातून वाहणार्या मोर्णा नदीचा प्रवाह शहरातील सांडपाणी, केरकचर्याने आधीच मलिन झाला असताना, आता त्यात निर्माल्याचीही भर पडत आहे. गत अनेक वर्षांपासून स्वच्छतेची आस लावून बसलेल्या मोर्णा नदीचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे चित्र कायम आहे.
शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोर्णा नदी ही शहरातील सर्व घटनांची मुक साक्षीदार आहे. कित्येक शतकांपासून असलेला मोर्णेचा प्रवाह अलिकडच्या काही वर्षांमध्ये काळवंडला आहे. शहरात प्रवेश करण्यापूर्वी अत्यंत निर्मळ असलेले मोर्णा नदीचे पाणी शहरात तितकेचे घाणेरडे झालेले दिसते. शहरातील सर्व सांडपाणी नदीला येऊन मिळते. त्यामुळे नदीला अत्यंत बकाल स्वरुप आले आहे. जलकुंभीमुळे या नदीचा श्वास कोंडला जात असतानाच आता सणासुदीच्या दिवसांत निर्माल्यांचीही त्यात भरच पडत आहे. महिलांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा सण असलेला हरितालिका रविवारी पार पडला.
हरितालिका पुजेचे विसर्जन करण्यासाठी सोमवारी मोर्णा नदीच्या काठावर महिलांनी मोठी गर्दी केली होती. या पुजेचे निर्माल्य नदीत विसजिर्त करण्यात आल्याने नदीमध्ये सर्व पान-फुले दिसत होती. आता गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर गणेश मुर्तींचेही विसर्जन या नदीत होणार असल्यामुळे या समस्येत भरच पडणार आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी व्यथित आहेत.