अकोला: सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटरकप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मी गावाचे काही तरी देणं लागतो, या जबाबदारीची जाणीव झाली आहे, अशी जाणीव जागृती करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये श्रमदानाला प्रबोधनपर गीतांची जोड मिळत असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असल्याचे चित्र पातूर तालुक्यातील पाचरण या गावात आहे.
पातूर तालुक्यात पाचरण व इतर गावांमध्ये वॉटर कप स्पर्धेत अपेक्षित ध्येयापेक्षा मोठे काम होत आहे. सकाळपासूनच ग्रामस्थ श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचत असून, तेथे सीसीटी तयार करण्यासाठी श्रमदान करत आहेत. या ग्रामस्थांना पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुभाष नानवटे, प्रशिक्षक राधिका मालधुरे, सोनाजी असातकर आदी मागदर्शन करीत आहेत. गावातील वृद्धासह तरुणही श्रमदानाच्या कामात अग्रेसर असल्यामुळे गावालगतच्या लहान टेकडीचे स्वरूपच बदलले आहे. ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांनी ग्रामस्थांसह श्रमदान करून सामूहिक गीतांमध्ये सहभाग घेतला.