ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 12 - देशात चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला आहे. सुट्या पैशांअभावी नागरिकांनी स्वेटर खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऊबदार कपड्यांची विक्री दोन दिवसांत 75 टक्क्यांनी घटली असून, त्याचा मोठा फटका स्वेटर विक्रेत्यांना बसला आहे.
थंडी पडताच नागरिकांची पावले स्वेटर खरेदीकडे वळतात. विविधरंगी स्वेटर खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून, शहरात तिबेटी स्वेटर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.
स्वराज्य भवनलगतच्या मनपा शाळेच्या परिसरात तिबेटी स्वेटर विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, या ठिकाणी 16 दुकाने थाटण्यात आली आहेत.
दिवाळीपूर्वी सुरू झालेल्या या दुकानांमधून स्वेटर व इतर ऊबदार कपडे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. दरवर्षी तिबेटी स्वेटर विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात उबदार कापडांची विक्री होते. यावर्षी थंडी चांगली असल्यामुळे सुरुवातीला या स्वेटर विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय झाला. परंतु 8 नोव्हेंबर रोजी 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून स्वेटर विक्रेत्यांचा व्यापार थंडावला आहे.
दोन दिवसांपूर्वी दररोज लाख ते दीड लाख रुपयांचा माल विकला जात होता; परंतु दोन दिवसांत ही विक्री दिवसाला 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. सुटे पैसे नसल्याने नागरिकांना स्वेटर खरेदी करता येत नाही, तर विक्रेत्यांना ग्राहकांकडे सुटे पैसे नसल्याने सोडून द्यावे लागत आहे.
स्वेटरची किंमत साधारण 400 ते 1500 रुपयांच्या दरम्यान असल्याने एखाद्याने 800 रुपयांचा स्वेटर घेतला, तर विक्रेत्याला देण्यास लोकांकडे 500 व 1000 रुपयांच्या नोटांऐवजी सुटे पैसे नाहीत. काही विक्रेते गुरुवारी 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारत होते; मात्र त्यांच्याकडीलही सुटे पैसे संपल्याने ग्राहकांना नाही म्हणावे लागत होते. त्यामुळे स्वेटर व्यावसायिकांच्या विक्रीला ऐन थंडीत फटका बसला आहे. सुटे पैसे नसल्याने या विक्रेत्यांना नुसते बसून राहावे लागत आहे.
‘सिझन’ निघून जात असल्याची खंत
तिबेटी स्वेटर विक्रेत्यांना दरवर्षी येथे दुकाने थाटण्याची 90 दिवसांची परवानगी असते. दुकानांसाठी प्रत्येकी 60 हजार रुपये शुल्क आकारले जाते. गेल्या दोन दिवसांपासून व्यवसाय थंडावल्याने हा सिझन असाच निघून जातो की काय, अशी भीती स्वेटर विक्रेत्यांना सतावत आहे.
नोटबंदीचा व्यवसायाला फटका
मागच्या वर्षी थंडी नसल्यामुळे व्यवसाय झाला नाही. यावर्षी थंडी चांगली असल्यामुळे व्यवसाय चांगला होण्याची अपेक्षा होती; परंतु 500,1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याचा आम्हाला फटका बसला आहे. स्वेटर खरेदीसाठी नागरिक येत नसल्यामुळे व्यवसाय बसला आहे. - लोपसंग ताशी, तिबेटी स्वेटर विक्रेता.
https://www.dailymotion.com/video/x844hnr