ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ७ - अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी येथे मुलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार प्रकरणी दोषारोपपत्र येत्या २४ तासात न्यायालयात दाखल करणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील युवतींना शुक्रवारी सकाळी दिले.
कोपर्डी घटनेला ८५ दिवस उलटल्यावरही पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल न केल्याने अकोला जिल्हयातील मराठा मोर्चाव्दारे नेहरु पार्क चौक येथे मानवी साखळीव्दारे काळया फीती लावून निषेध व्यक्त करीत असताना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी थांबून युवतींना हे आश्वासन दिले.
कोपर्डी येथील मुलीवर तीन नराधमांनी अमानुष बलात्कार केला. या विरोधात राज्यभरात मराठयांचे मुक मोर्चे काढण्यात येत असले तरी पोलिसांनी मात्र ८५ दिवस उलटले असतानाही दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले नाही.
९० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आरोपींना जामीन मिळण्याची दाट शक्यता असल्याने ९० दिवस होण्याआधी पोलिसांनी या प्रकरणाचे दोषारोपपत्र ताताडीने न्यायालयात सादर करावे या मागणीसाठी अकोला जिल्हयातील मराठा मुक मोर्चातील युवती आणि युवकांनी नेहरु पार्क चौक ते अशोक वाटीका रोडवर काळे कापड परिधान करून आणि हातात फलक धरुन मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या हलगर्जी कारभाराचा निषेध केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजातील युवक-युवतींची ही मानवी साखळी दिसताच त्यांनी ताफा थांबवून युवतींशी चर्चा केली. त्यानंतर तात्काळ या प्रकरणातील तपास अधिकाºयांशी चर्चा करून कोपर्डी घटनेचे दोषारोपपत्र २४ तासाच्या आत न्यायालयामध्ये सादर करणार असल्याचे आश्वासन दिले.
बुलेटने नाही बॅलेटने उत्तर देऊ - युवतीने मुख्यमंत्र्याना सुनावले
कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण यासह मराठयांवर होणाºया अन्याय आणि अत्याचार विरोधात मराठा समाजातील युवतींशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी हिमानी भालतिलक या युवतीने आम्ही आता बुलेटने नाही बॅलेटने उत्तर देणार असल्याचा टोला थेट मुख्यमंत्र्यांना लगावला. सत्ता असतांनाही भाजप सरकार कोपर्डी सारख्या प्रकरणांमध्ये दिरंगाई करीत असून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मराठे आता मतपेटीतूनच उत्तर देणार असल्याचे या युवतीने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशुन म्हटले. या युवतीने धाडस करीत थेट मुख्यमंत्र्यांवरच प्रश्नांची सरबत्ती केली होती.