- राजेश शेगोकार
अकोला: भाजप-शिवसेना युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, यामध्ये ज्या १२ जागांचा गुंता निर्माण झाला आहे, त्यामध्ये वाशिममधील रिसोड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिवसेनेला विदर्भात केवळ आठ जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असून, युतीच्या शिक्कामोर्तबनंतर ही अस्वस्थता उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने १३० जागांची मागणी भाजपाकडे केली असून, त्यापैकी ११८ जागा देण्याबाबत निर्णय झाला असून, उरलेल्या १२ जागांबाबत दोन्ही पक्षांची दावेदारी मोठी आहे. त्यामध्ये विदर्भातील वाशिमच्या रिसोडचा समावेश असल्याची समजते. युती असताना २००९ मध्ये भाजपाने ही जागा लढविली होती त्यामुळे साहजिकच भाजपाने आपला दावा कायम ठेवला असून, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामलाही जागा हवी आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे स्वत: या मतदारसंघातून लढतील, अशी अटकळ गेल्यावेळीही होती; मात्र मेटेंनी बीडचा पर्याय निवडला त्यामुळे शिवसंग्रामसह शिवसेनाही रिसोडसाठी आग्रही असल्याने युतीचा गुंता वाढविण्यात या जागेचीही भर पडली असल्याची महिती आहे. दरम्यान, अशीच स्थिती अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाची असून, येथेही मित्रपक्षांचा दावा प्रभावी आहे; मात्र ही जागा सेनेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.