Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:08 AM2019-09-19T11:08:14+5:302019-09-19T11:09:08+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बाळापूर मतदारसंघावर १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९0 च्या निवडणुकीत भाजपचे किसनराव राऊत यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले.

Vidhan Sabha 2019: Balapur constituency intact; The 'Vanchit Bahujan' candidate declare after congress candidate | Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

Next

नितीन गव्हाळे

अकोला: बाळापूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे; परंतु गतवर्षीपासून भाजपचे मित्रपक्ष शिवसंग्राम, रासपनेसुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस या मतदारसंघात सातत्याने पराभूत होत असल्याने यंदा राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा या मतदारसंघावर प्रबळ दावा केला आहे. त्यामुळे बाळापूर मतदारसंघाचा गुंता अधिकच वाढला आहे.

बाळापूर मतदारसंघावर १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९0 च्या निवडणुकीत भाजपचे किसनराव राऊत यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. त्यानंतर भाजपचे नारायणराव गव्हाणकर आमदार होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव तायडे यांनी पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आणण्यात यश मिळविले; परंतु काँग्रेसला हे यश टिकविता आले नाही. पुन्हा भाजपचे गव्हाणकर आमदार म्हणून निवडून आले. पुढील विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भारिप-बमसंने आपल्या ताब्यात खेचून आणला. आता दहा वर्षांपासून बळीराम सिरस्कार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. गत निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडला होता; परंतु स्थानिक नेत्यांनी त्यात बदल करून या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना रिंगणात उतरविले; परंतु त्यांना येथून पराभूत व्हावे लागले. आता पुन्हा या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे; परंतु भाजपचे मित्रपक्ष शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष या मतदारसंघावर दावा करीत असल्याने, भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. १९६१ ते १९८५ आणि १९९0 हे वर्ष वगळता, काँग्रेस पक्ष येथून भुईसपाट झाला. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी या मतदारसंघावर प्रबळ दावा केला आहे. काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी देते, यावरून वंचित बहुजन आघाडी (भारिप-बमसं)चा उमेदवार ठरणार आहे. सध्यातरी बळीराम सिरस्कार यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. काँग्रेसने नातिकोद्दीन खतिब यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी जाहीर करते, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात खरा सामना भाजपविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असाच होण्याची शक्यता आहे; परंतु भाजप या मतदारसंघावरील दावा सोडून मित्रपक्ष शिवसंग्राम किंवा रासप यापैकी कोणाला ही जागा सोडतो, यावरही उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

मित्रपक्षाला जागा सोडणार की भाजप स्वत: लढणार?
बाळापूर मतदारसंघावर गतवर्षी शिवसंग्रामने दावा केला होता. अपेक्षेनुसार त्यांना हा मतदारसंघ सोडण्यात आला होता; परंतु स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसंग्रामच्या उमेदवाराला डावलून भाजपने उमेदवार उभा केला होता; परंतु आगामी निवडणुकीत भाजपचे मित्रपक्ष शिवसंग्राम, रासपने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे भाजप ही जागा कोणत्या मित्रपक्षाला सोडते की भाजप स्वत: उमेदवार रिंगणात उतरविते, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

हे आहेत, प्रमुख दावेदार
या मतदारसंघातून नशीब अजमाविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत. यात भारिपचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, भाजपचे माजी आ. नारायणराव गव्हाणकर, तेजराव थोरात, महापौर विजय अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम गावंडे, काँग्रेसचे प्रकाश तायडे, नातिकोद्दीन खतिब, ऐनोद्दीन खतिब, शिवसंग्रामचे संदीप पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

उमेदवाराची चर्चा नाही, तरीही रासपचा दावा!
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या रासपने बाळापूर मतदारसंघावर दावा केला खरा; परंतु रासपकडे प्रतिस्पर्धी उमेदवाराला लढत देईल, असा तुल्यबळ उमेदवार कोण? या पक्षाकडे सध्यातरी चर्चेतील चेहरा नाही. त्यामुळे रासपला हा मतदारसंघ सुटेल की नाही. याविषयी शाश्वती नाही.

Web Title: Vidhan Sabha 2019: Balapur constituency intact; The 'Vanchit Bahujan' candidate declare after congress candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.