Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:39 PM2019-09-21T13:39:20+5:302019-09-21T13:41:57+5:30
काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागांवर भाजपचे ‘कमळ’ फुलले तर अवघ्या १० जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. या पृष्ठभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर आहे. काँग्रेसने प्रथमच निवडणुकीसाठी विभागवार प्रभारींची निवड केली असून, विदर्भाची जबाबदारी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यावर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. त्यामुळे काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
अ.भा. काँगे्रसचे ज्येष्ठ सरचिटणीस असलेल्या वासनिकांचा प्रवास बुलडाण्याचे खासदार ते दिल्लीच्या वर्तुळातील बडे प्रस्थ असा आहे. इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाचा अनुभव, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत प्रत्यक्ष काम मध्य प्रदेश, राज्यस्थान, बिहार व केरळ अशा अनेक प्रदेशांचे प्रभारी राहिलेल्या वासनिकांकडे सध्या लक्षद्वीप, पाँडेचरी, अंदमान व केरळ या राज्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या या प्रभावी कारकिर्दीमुळेच त्यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत होते. अखेरच्या क्षणी सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यावर वासनिकांचे नाव मागे पडले. या पृष्ठभूमीवर वासनिकांना देण्यात आलेली विदर्भाची जबाबदारी त्यांच्या संघटन कौशल्याची परीक्षा ठरणार आहे.
पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांतून संसदेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या वासनिकांना उमेदवार निवडीपासूनच कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केलेली उलथापालथ लक्षात घेता, या पक्षाच्या उंबरठ्यावर अनेक नेते आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ‘वंचित’सोबत घरोबा करण्याची तयारी काहींनी करून ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी होणाºया गटबाजीची लॉबिंग हाणून पाडत मेरिटवर उमेदवारी देण्यात वासनिक यशस्वी ठरले तर लढाईमधील पहिला टप्पा ते जिंकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. पश्चिम विदर्भात तर त्यांचा शब्द हा काँग्रेसमध्ये प्रमाण आहे. त्यामुळे या भागात जिंकलेल्या पाच जागा कायम ठेवत विजयाचा आकडा वाढविण्यासाठी त्यांना गटबाजी संपवावी लागणार आहे.
यवतमाळ व नागपुरातील गटबाजी सर्वश्रुत आहे. बुलडाण्यात चिखलीचे आमदार हे पक्षांतराच्या वाटेवर असल्याची चर्चा शमता शमत नाही. अकोला जिल्हा हा काँग्रेसमुक्त जिल्हा झाला आहे. दोन दशकांपासून काँग्रेसला हा हक्काचा आमदार मिळालेला नाही. मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीमध्ये अनेक नेते हे वासनिकविरोधी आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात आहे. एक लोकसभा मतदारसंघ सोडला तर सर्व जागांवर भाजपा, शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्यामुळे या सर्व आव्हानांचा सामना करीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवून काँगे्रसला एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात वासनिकांना कितपत यश येते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.