vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:19 PM2019-09-23T14:19:32+5:302019-09-23T14:19:37+5:30
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे.
अकोला: विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना व भाजपमधील युतीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे. आजच्या घडीला सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे लक्ष नेत्यांच्या आदेशाकडे लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, राजकीय मोर्चेबांधणीसाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख समजताच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला मूर्तिजापूर मतदारसंघ जाणार, हे निश्चित असले तरी आज रोजी बाळापूर आणि अकोला पश्चिमसाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा दावा दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केला जात असला तरी जागा वाटपाच्या मुद्यावरून ऐनवेळी या दोन्ही पक्षांत कधी बिनसणार, याची काहीही शाश्वती नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भाजप-सेनेच्या गोटातून पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची तयारी केली जात असल्याचे चित्र तूर्तास समोर आले आहे.
‘वंचित’मुळे बिघडणार राजकीय समीकरणे!
जिल्ह्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे. अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राकाँला टाळी न देता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीत रंगत येईल, हे निश्चित. यादरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रतिकूल परिणाम होईल, असे दिसत आहे.
राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. आमची बुथ रचना मजबूत असून, निवडणूक संचालन समिती फार पूर्वीच कामाला लागली आहे. आम्ही पाचही विधानसभा मतदारसंघांत कामाला लागलो आहोत. कार्यकर्ता, बुथ प्रमुख, पक्षप्रमुख आमची शक्तीस्थळे असून, २५ सप्टेंबरपासून मुख्यमंत्र्यांचे पत्र घरा-घरांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहे.
-तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष भाजप.
शिवसेनेने तीन वर्षांपूर्वीपासूनच पाचही विधानसभा मतदारसंघांत बुथ प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची मजबूत बांधणी केली आहे. बुथ प्रमुखांना केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची प्रतीक्षा असून, तो प्राप्त होताच सर्व कामाला लागतील.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.
राष्ट्रवादीच्या वाट्याला जिल्ह्यातून दोन मतदारसंघ येतील. त्यापैकी मूर्तिजापूर मतदारसंघात मजबूत बांधणी केली आहे. उर्वरित एका मतदारसंघावर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल. आघाडी असल्यामुळे पाचही मतदारसंघांत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत.
-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने जिल्हाभरात बुथ कमिट्यांचे गठन करून कार्यकर्त्यांना सक्रीय केले आहे. महागाई, बेरोजगारी यांसह शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचे पैसे मिळाले नसल्याचे चित्र आहे. पीक विम्याचे पैसे खात्यात जमा झालेच नाहीत. भाजप सरकारने कापूस आयात करण्याचे धोरण आखले आहे. त्याचा स्थानिक कापूस उत्पादक शेतकºयांवर नक्कीच परिणाम होईल. या सर्व बाबी जनतेने लक्षात घेणे अपेक्षित आहे. यंदा जिल्ह्यात बदल होण्याची अपेक्षा आहे.
-हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाच विधानसभा मतदारसंघांत मजबूत, सक्षम आणि प्रभावी उमेदवार रिंगणात उभे केल्या जातील. त्यादृष्टीने आमची संपूर्ण तयारी झाली आहे. बुथ प्रमुख सक्रिय झाले असून, या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते उत्साहित आहेत. ‘साहेबां’च्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
-प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.