लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राजकारणात पद, प्रतिष्ठा मिळविण्याच्या उद्देशातून स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे पदाधिकारी ऐनवेळेवर स्वपक्षातून फारकत घेत दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. कालांतराने कोलांटउड्या मारत पुन्हा स्वपक्षात प्रवेश घेत असल्याची असंख्य उदाहरणे पाहावयास मिळतात. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळावे, यासाठी स्वत:च्या निष्ठेवर कोणीही शंका घेऊ नये, या विचारातून क ाँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील एका पदाधिकाºयाने ‘सेफ गेम’ खेळत तिकिटाची शाश्वती असेल तरच राजकीय प्रवेशाचे संकेत देत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या उंबरठ्यावर डोके टेकवल्याची माहिती समोर आली आहे.मागील अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून विविध पदे, मान सन्मान मिळविणाºया पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या अपेक्षा कालांतराने वाढत जातात. त्यात काहीही गैर नसले तरी स्वपक्षात आमच्याशिवाय दुसरे कोणी निष्ठावानच नाहीत, असा सूर आवळल्यानंतर मात्र कालांतराने त्याच पक्षाने कधी संधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाच, तर आमचा पक्ष कसा अन्याय करतो, याबद्दल तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त केली जाते. अशा असंतुष्टांची नाराजी लोकसभा, विधानसभा असो वा स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीदरम्यान उफाळून बाहेर येते. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तिकीट द्यावे, अशी अपेक्षा बाळगून असणाºया काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावरील एका पदाधिकाºयाने गत वर्षभरापासून स्वत:ची वेगळी चूल मांडली. शहरातील विविध समस्या निकाली काढण्यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केल्या जात असले तरी प्रत्यक्षात कोणत्याही समस्या निकाली निघाल्या नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जाती-पातीचे समीकरण व भाजपची ताकद लक्षात घेता पक्षाकडून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार नसल्याची जाणीव झाल्यानंतर संबंधित पदाधिकाºयाने चक्क शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याची भेट घेऊन पक्ष प्रवेशावर प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती आहे.शिवसेनेत नाराजी; प्रस्ताव गुंडाळला!काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाºयाने शिवसेनेच्या नेत्याकडे चर्चा केल्याची बाब उघड होताच अकोला पश्चिम मतदारसंघात मागील तीन वर्षांपासून निवडणुकीसाठी बांधणी करणाºया सेनेच्या पदाधिकाºयाने आपल्या पक्षाच्या नेत्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या मुद्यावरून भविष्यात पक्षांतर्गत नाराजी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सेना नेत्याने काँग्रेसचा प्रस्ताव गुंडाळल्याचे बोलल्या जाते.
‘वंचित’ने ठेवले ‘वेटिंग’वर!शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाचा फॉर्म्युला अपयशी ठरल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाºयाने वंचित बहुजन आघाडीकडे प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव ‘वंचित’ने ‘वेटिंग’वर ठेवल्याची माहिती असली तरी ‘वंचित’मधील सक्रिय पदाधिकाऱ्यांचीच वर्णी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.