लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट तालुक्यातील रौंदळा येथील ग्रामसेवकाने प्लॉटची नोंदणी व नमुना आठ ‘अ’ देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली. रवींद्र राम गंडाळे (३२) रा. आसरा कॉलनी, अकोला नाका, अकोट असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.ग्रामसेवक रवींद्र गंडाळे याने त्यांच्या प्लॉटची नोंदणी करण्यासाठी व नमुना आठ ‘अ’ ची मागणी करण्यासाठी तक्रारदार हे ग्रामसेवक रवींद्र गंडाळे या लाचखोराकडे गेले होते; मात्र रवींद्र गंडाळे याने ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची नसल्याने तक्रारदाराने अकोला एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने २० नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान ग्रामसेवक गंडाळे याने ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक गंडाळे यांनी अकोला येथे तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले व नंतर तुझे काम होईल, असे सांगितल्यानुसार, तक्रारदारासह एसीबीने पंचासमक्ष सापळा रचला. एसीबीचे अधिकारी अकोल्यातील दामले चौकात पाल गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पहिल्या माळ्यावर दबा धरून बसले होते. येथे तक्रारदार पोहोचल्यानंतर ग्रामसेवक गंडाळे याने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात पथकातील गजानन दामोदर, अनवर खान, अभय बावस्कर, नीलेश शेगोकार यांनी केली.
ग्रामसेवकाला ४ हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:56 AM