व्याळा : येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गाव प्रतिबंधित केले असून, गावांच्या सीमा सील केल्या आहेत. असे असतानाही गावात सर्वच व्यवहार सुरू असून, नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे. याकडे ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत गावात कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ८० च्यावर व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
व्याळा हे गाव कोरोनाचे हॉटस्पाॅट असूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सद्यस्थितीत प्रशासक राज असून, गावात प्रशासक सतत गैरहजर राहत आहेत. तसेच ग्रामसेवकासह तलाठी व अनेक जण समितीत असतानाही अधिकारी गावात ११ वाजतानंतर पोहोचत आहेत. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने लसीकरण, कोविड तपासणी शिबिराला प्रतिसाद दिला नाही. तसेच गावात जनजागृती केली नसल्यानेच कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. काही ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन, समितीची तक्रार आमदार नितीन देशमुख, तहसीलदार, बीडीओ, जि.प. सदस्य वर्षा वझिरे यांच्याकडे केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गावात आणखी कडक उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------------
रेतीची अवैध वाहतूक जोरात
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्याळा हे गाव प्रतिबंधित क्षेत्रात करून गावाच्या सीमा सील करण्यात आल्या, तरीही गावात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच गावात रेतीच्या अवैध वाहतुकीसह अनेक वाहने राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे.