विजय शिंदे - अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अकोट तालुक्यात दृष्काळाशी सामना करणाऱ्या ‘जलक्रांती’करिता ग्रामस्थ एकवटले आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ या स्पर्धेसाठी एकूण ३३ गावांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यापैकी अकोट तालुक्यात २१ गावात जलचळवळीचे ‘तुफान’ आल्यागत परिस्थिती झाली आहे.खोलवर गेलेल्या पाण्याला वर आणण्याकरिता राजकारण व स्वार्थ, मतभेद दूर ठेवीत कोणताही निधी अथवा खर्च नसलेल्या अभियानात केवळ श्रमदानाने मानवी साखळी निर्माण झाली आहे.अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार, सावरा, कावसा, उमरा, खैरखेड, जितापूर, पळसोद, रूपागड, गरसोळी, वरूर, अडगाव, हनवाडी, लामकाणी, सोनबर्डी, बोरी, जनुना, रूईखेड, एदलापूर, लोहारी, खिरखुंड, डोंगरखेडा या गावांनी श्रमदानात आघाडी घेतली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत असल्याने ग्रामवासी भल्या पहाटे सकाळी ५ वाजतापासून श्रमदान करण्यास सज्ज होतात. श्रमदानास लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच लोक प्रामुख्याने सामाजिक संघ संस्था, संघटना श्रमदान करत आहेत. नाला खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्ष लावगडीकरिता खड्डे,आदींसह जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत.या कामात अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे व गटविकास अधिकारी कालिदास तापी हे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून जितापूर रूपागड, आसेगाव, लामकाणी, अडगावसह दररोज एक-दोन गावांमध्ये श्रमदान करतात. या जलक्रांतीकरिता पाणी फाउंडेशन अकोटचे समन्वयक नरेंद्र काकड हे जनजागृती करीत उत्कृष्ट मार्गदर्शन करीत आहेत. शिवाय सामाजिक प्रशिक्षक सविता पेठकर,तांत्रिक प्रशिक्षक उज्ज्वल बोलवार, बाळासाहेब बढे कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य तसेच तंटामुक्तीचे पदाधिकारी हे सहकार्य करीत आहेत. जलचळवळीकरिता संकल्प व उपक्रमउमरा ग्रामवासीयांनी ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत गावात वाढदिवस साजरा न करता तो बंधाऱ्यावर श्रमदान करून साजरा करावा, असे ठरवले. या गावात मुलाचा वाढदिवस बांधावर साजरा केला, करीत ग्रामस्थांनी भेट वस्तू म्हणून टोपले, फावडे व घमीले श्रमदानासाठी देत आहेत. आसेगाव येथे विद्यार्थी यांनी आपली शिष्यवृत्ती श्रमदानासाठी दिली आहे. जितापूर रूपागड गावाने संपूर्ण दारूबंदी करून श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्राम लामकाणी गावाने देहदान, नेत्रदान संकल्प करून श्रमदानास सुरुवात केली आहे. गाणी,गप्पा,गोष्टीकरिता मनोरंजनाने कामाला गती देण्यात येते. उमरा ग्रामवासीयांनी पाण्यासोबत गावकऱ्यांचे लग्न लावीत ‘पाण्याच्या थेंबात’ नवरदेवाची मिरवणूक गावातून काढली. गावकऱ्यांना श्रमदानासाठी घरोघरी जावून अक्षत दिली.
‘जलक्रांती’साठी एकवटले ग्रामस्थ!
By admin | Published: April 12, 2017 2:15 AM