पनोरी : येथील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात बसून शुक्रवार २ आॅक्टबर रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.अकोट तालुक्यातील पनोरी येथे दनोरी-पनोरी मार्गावर पठार नदीवर पूल बांधण्यात आला; मात्र या पुलाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. तसेच नदीला पूर आल्यास पाणी पुलावरू न वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुलाचे नवीन बांधकाम व पुलाची उंची वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली; मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत नदीपात्रात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. याची तत्काळ दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली व दनोरी-पनोरी रस्त्याचे व पुलाचे त्वरित काम करण्याचे लक्ष देण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनात विजय दाते, गणेश बुटे, तुकाराम कडू, राहुल वानखडे, प्रवीण फुकट, प्रमोद बुटे, आदीनाथ खोब्राखडे, दयाल म्हातुरकर, हरिदास बुटे, सुरेश बुंदे, हेमंत मेतकर, दिगंबर बुंदे, ज्ञानेश्वर दाते, रोशन वानखडे, राजू राणे, कुलदीप बडदिया, राजू बुटे, शुभम बुटे यांचा सहभाग होता.