अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदावर भाजप नगरसेवक विनोद मापारी यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी प्रशासनाकडे विनोद मापारी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सभागृहात त्यांची निवड झाल्यानंतर सभेचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, महापौर विजय अग्रवाल यांनी मापारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधून आठ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी मुख्य सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेमध्ये आणखी दोन सदस्यांनी राजीनामा सादर केल्याने १० सदस्यांची निवड करण्यात आली. यादरम्यान, भाजप नगरसेवक विशाल इंगळे यांच्या सभापती पदाचा कार्यकाळ १ मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवड प्रक्रियेसाठी ७ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पदासाठी भाजपकडून एकमेव विनोद मापारी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यामुळे सभागृहात मापारी यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. सभापती पदावर मापारी यांची निवड झाल्यानंतर त्यांचे महापौर विजय अग्रवाल, आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर वैशाली शेळके, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, शिवसेनेचे सदस्य मंगेश काळे, सारिका जयस्वाल, डॉ. विनोद बोर्डे, हरीश काळे, नगरसेविका दीपाली जगताप व अर्चना मसने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.