काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:06 PM2019-04-17T14:06:27+5:302019-04-17T14:07:09+5:30
अकोला - मराठा मंडळ कार्यालयात विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला - मराठा मंडळ कार्यालयात विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत यावेळी सभा घेण्यात आली होती; मात्र निवडणूक विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही सभा विनापरवानगी असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
निवडणूक विभागाची परवानगी न घेता मराठा मंडळ कार्यालयामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रकाराची माहिती निवडणूक विभागाचे हरिशचंद्र गोविंदराव डांगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सभा आयोजित करणाऱ्यांना परवानगीचे दस्तावेज मागितले असता, आयोजकांनी ही सभा विनापरवानगी सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशांत गावंडे यांच्यासह २५४ कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणाची तक्रार त्यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत गावंडेंसह २५४ कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १३५ आणि १८८ नुसार आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे.