अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’, मास्कचा वापर आदी नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील तीन हजार १४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. २२ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत या २१ दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ मास्कचा वापर आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महसूल, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी विभागांच्या संयुक्त पथकांव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गत २२ ते १४ मार्चपर्यंत या २१ दिवसांच्या कालावधीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यात तीन हजार १४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड प्रशासनामार्फत वसूल करण्यात आला.
तालुकानिहाय दंडात्मक कारवाई
केलेल्या व्यक्तींची अशी आहे संख्या!
तालुका व्यक्ती
अकोट ३३३
अकोला ग्रामीण २३
अकोला शहर १७७३
तेल्हारा १०४
मूर्तिजापूर २३६
बार्शिटाकळी २५९
बाळापूर १३४
पातूर १५२
.............................................
एकूण ३०१४
अकोला तालुक्यातील ग्रामीण
भागात सर्वात कमी कारवाई !
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गत २१ दिवसांपासून जिल्ह्यात प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात तीन हजार १४ व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वात कमी दंडात्मक कारवाई अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात आली. अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात केवळ २३ व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. १४ मार्चपर्यंत गेल्या २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन हजार १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी