पातूर : अनलॉक प्रक्रियेत बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता, प्रवाशांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज असताना, प्रवाशांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
हरभरा सोंगणी अंतिम टप्प्यात!
म्हातोडी : परिसरात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. सद्य:स्थितीत घुसर, म्हातोडी, घुसरवाडी शिवारांत हरभरा सोंगणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. परिसरात एकरी पाच ते सहा क्विंटल उतारा लागत आहे.
हातावर पोट असणाऱ्यांची अडचण
अकोट : लाॅकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. आधीच जेमतेम उत्पन्न असताना आता व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक व दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पिंजर भागात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
पिंजर : गावात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासणार!
तेल्हारा : खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसामुळे विविध बियाणे कंपन्यांचे सीड प्लॉट नापास होण्याची शक्यता असल्याने बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
नया अंदुरा येथे हॉटेल, दुकाने सुरूच!
नया अंदुरा : येथे कोरोनाचे तीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. आता संपूर्ण नया अंदुरा गावात भीतीचे वातावरण असताना, येथील किराणा दुकाने, हॉटेल, सलून दुकाने खुलेआम सुरू आहेत. प्रशासनाने कारवाई करावी.
कापूस उत्पादक शेतकरी संकटात
खिरपुरी बु. : खिरपुरी बु. शिवारात सध्या उलंगवाडी झाली आहे; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे. खिरपुरी बु., नांदखेड, टाकळी खुरेशी भागात मजुरी वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कोरोनामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती!
चिखलगाव : पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिखलगावात भीती व्यक्त होत असून, गावात शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे ग्रामपंचायतीने कळविले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव; तरीही गंभीरता नाही!
बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. असे असतानाही बोरगाव मंजू परिसरात नागरिक गंभीर दिसत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यांकडे नागरिक कानाडोळा करीत आहेत. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
धुळीमुळे पिकांचे नुकसान
अंदुरा : परिसरात गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहने जात असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.
नियमांचे उल्लंघन
हिवरखेड : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, ग्रामस्थांमध्ये काेराेनाविषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून, नियमांचे उल्लंघन हाेत आहे.
पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
बाळापूर : परिसरातील पाणंद रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, राेजगार हमी याेजनेतून पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सौरऊर्जेचे कुंपण अनुदान द्यावे
बार्शी टाकळी : वन्यप्राण्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्लेदेखील होतात. यामुळे सौरऊर्जेवरील कुंपण उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
तालुक्यातील बसफेऱ्या अजूनही बंदच
तेल्हारा : तालुक्यातील बहुतांश गावांना तेल्हारा आगारातून बसेस सोडण्यात येत आहेत; परंतु महत्त्वाच्या बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
भाजीपाला उत्पादकांना ‘बाजार बंद’चा फटका
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच वेळी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे भाजीपाल्याचे दर अतिशय घसरल्याने त्यांचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
बाजारात कैरीला ग्राहकांची पसंती
अकोट : उन्हाचा प्रकोप वाढत असल्याने, बाजारात कैऱ्यांची आवक वाढली असून, अकोट परिसरातील गावकरी कच्च्या कैऱ्यांना पसंती देत आहेत. ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात कैरी विकली जात आहे.