मागील काही दिवसांपासून शहरात संसर्गजन्य काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. काेराेनामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली असून शहरातील खासगी रुग्णालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातही खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता शहरात अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यादरम्यान, काही रुग्णालयांकडून काेराेनाच्या नियमावलीचे पालन केले जात नसल्याची बाब मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी ३१ मार्च राेजी शहरातील एका खासगी रुग्णालयाची आकस्मिक पाहणी केली असता त्याठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी शनिवारी रुग्णालय व्यवस्थापनाला नाेटीस जारी केली असून त्यामध्ये एक महिन्याच्या कालावधीत नियमांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
नियमांचे उल्लंघन; खासगी रुग्णालयाला नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:18 AM