सुभाष मोर/ नांद्रा (लोणार, जि. बुलडाणा):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ह्यबेटी बचाओह्ण मोहिमेला २२ जानेवारी रोजी बुलडाण्यात प्रारंभ झाला. या पृष्ठभूमीवर मुलगी वाचविण्यासाठी माता-पित्याने केलेल्या धडपडीची एक उदाहरण लोणार तालुक्यातील धाड येथून समोर आले आहे. गुदद्वार नसलेले जगावेगळे व्यंग घेऊन जन्माला आलेल्या एका अभागी बालिकेवर उपचारांची शर्थ करून तिला जीवनदान दिले आहे.लोणार तालुक्यातील धाड या छोट्याशा गावचे रवींद्र मदनलाल जाजड व संतोषी रवींद्र जाजड या दाम्पत्यला दहा महिन्यापूर्वी एक सुंदर मुलगी जन्माला आली. मुलीच्या जन्मामुळे आनंदीत झालेल्या माता पित्याने तिचे नाव आस्था ठेवले; परंतु जन्मापासूनच नियतीने तिचा सूड व तिच्या आई-वडिलांची परीक्षा घेण्याचा जणू चंगच बांधला. जन्मवेळीच आस्थाचे वजन केवळ एकच किलो होते. त्यामुळे तिला एक महिना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. घरी आणल्यानंतर आस्थाला अंघोळ घालताना आस्थाला जन्मत: गुदद्वारच नव्हते, हे तिच्या आईच्या लक्षात आले. दवाखान्यात जवळपास एक महिना तिने लघवीवाटेच संडाससुद्धा केल्याने हे डॉक्टरसह कोणाच्याच लक्षात आले नाही; परंतु जेव्हा हे आई-वडिलांच्या लक्षात आले तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. तरीपण त्यांनी खचून न जाता सर्वतोपरी उपचार करुन तिला जीवनदान देण्याचा पक्का निर्धार केला. त्यानंतर आस्थाच्या उपचारासाठी औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, नागपूर आदी सर्व ठिकाणे पालथी घातली. शेवटी अमरावती येथे उपचार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आस्थाचे वजन वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. नंतर अवघ्या पाच महिन्यातच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर परत दुसरी शस्त्रक्रिया करुन शौचास करण्यासाठी पोटाच्या डाव्या बाजूला जागा करण्यात आली. आता मार्च २0१५ या महिन्यात तिसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर आस्था अगदी सामान्यपणे सर्व क्रिया करु शकणार आहे. हा सर्व प्रकार सांगताना, मातापित्यांच्या चेहर्यावर एखादी फार मोठी लढाई जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. अवघ्या दहा महिन्याच्या वयामध्ये तीन शस्त्रक्रियांना सामोरे जावून आस्था अगदी आनंदी दिसते. रवींद्र जाजड यांच्याकडे कोणत्याच प्रकारची नोकरी धंदा, शेती नसून केवळ रोजंदारीच्या भरवशावर ते हा संघर्ष पेलत आहेत. गर्भातच मुलीची हत्या करणार्या, तसेच जन्मानंतरही मुलीला शाप मानणार्यांसाठी जाजड यांनी आपल्या सत्कृतीतून एक आदर्श निर्माण केला आहे.
मृत्यूच्या जबड्यातून वाचविले कन्यारत्न !
By admin | Published: January 23, 2015 1:33 AM