अतुल जयस्वाल/अकोला: सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातील सर्वात मोठी संस्था 'लायन्स क्लब इंटरनॅशनल'च्या भारतातील शाखांपैकी एक असलेल्या 'डिस्ट्रिक्ट ३२३ एच-२' यांच्यावतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या महाराष्ट्रातील १४ जिल्हय़ांमध्ये गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी तब्बल ४ लाख शालेय विद्यार्थ्यांची 'व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट' करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांची वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच दिवशी ही चाचणी घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये केली जाणार आहे. 'लायन्स क्लब इंटरनॅशनल' या जगातील सर्वात मोठय़ा सामाजिक संस्थेला वर्ष २0१७ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकपूर्ती महोत्सवानिमित्त जगभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या संस्थेच्या महाराष्ट्रातील चार शाखांपैकी एक असलेल्या लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३ एच -२ यांच्यावतीने 'लायन्स दृष्टी' हा उपक्रम सुरू केला आहे. या लायन्स क्लबचे डिस्ट्रिक अँक्टिव्हिटी चेअरपर्सन डॉ. संजय वोरा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमांतर्गत डिस्ट्रिक्ट ३२३ एच -२ च्या कार्यकक्षेत येत असलेल्या महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, बुलडाणा, हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार या १४ जिल्हय़ांमध्ये ८ ऑक्टोबर रोजी ५00 पेक्षाही अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. एकट्या अकोला शहरात जवळपास २0 हजार विद्यार्थ्यांची ही टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी गत महिनाभरापासून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तसेच तेथील शिक्षकांनाच 'व्हिजन स्क्रिनिंग'चे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, विविध केंद्रांवरच्या विद्यार्थ्यांच्या चाचणीबाबतच्या नोंदी वाशिम येथील मुख्य केंद्रावर पाठविण्यात येतील. तेथे त्याची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये केली जाणार असल्याची माहिती डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन कौशल भाटिया यांनी दिली. *अशी होईल चाचणी या उपक्रमांतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्वच शाळेतील शिक्षकांना व्हिजन स्क्रिनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांंना नेत्रतज्ज्ञांनी पुरविलेल्या फलकाचे अवलोकन एका विशिष्ट अंतरावरून करण्यास सांगतील. या फलकावर काही अक्षरे रेखाटलेली असतात. विद्यार्थ्यांची दृष्टी नीट असेल, तर ते बिनचूक ही अक्षरे ओळखतील. ज्यांना अक्षरे नीट ओळखण्यात समस्या आली, तर त्यांना नेत्रतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला जाईल.
‘लायन्स दृष्टी’ करणार ४ लाख विद्यार्थ्यांची ‘व्हिजन स्क्रिनिंग टेस्ट’!
By admin | Published: October 07, 2015 10:46 PM