अकोला: शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी जिल्हयात वीटभट्टी शाळा सुरु करण्याचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.
शाळाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यामध्ये वीटभट्टीसह अन्य कामांच्या ठिकाणी पालकांसोबत राहणाऱ्या मुलांचा समावेश आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी समिती सदस्य आम्रपाली खंडारे यांनी सभेत केली. त्यानुषंगाने शाळाबाह्य मुलांसाठी साखर शाळेच्या धर्तीवर जिल्हयात वीटभट्टी शाळा सुरु करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
विद्यार्थी गळतीच्या प्रमाणावर विचारणा!
जिल्हा परिषद शाळांमधील जिल्हयात इयत्ता चवथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण किती आहे, यासंदर्भात सभेत विचारणा करण्यात आली; मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी यासंदर्भात सभेत माहिती देऊ शकले नाही. तसेच शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा अहवाल काय आहे, शाळाबाह्य मुलांसाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, असा प्रश्नही सदस्य आम्रपाली खंडारे यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात लवकरच माहिती देण्यात येणार असल्याचे प्राथमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत सांगीतले.