राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘आषाढी’निमित्त ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसची पहिली फेरी बुधवार, २८ रोजी अकोला मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. सायंकाळी ५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर दाखल झालेल्या या विशेष गाडीला अकोलेकर भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी गाडीच्या स्वागतासाठी तिच्या आगमनापूर्वीच रेल्वेस्थानकावर हजर राहणारे अधिकारी व पदाधिकारी फिरकलेसुद्धा नसल्याची बाब यंदा प्रकर्षाने जाणवली. ‘आषाढी’निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वैदर्भीय भाविकांसाठी अमरावती व नागपूर येथून ‘विठ्ठल दर्शन’च्या विशेष फेऱ्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यापैकी पहिल्या फेरीचा श्रीगणेशा बुधवारी न्यू अमरावती रेल्वेस्थानकावरून झाला. अमरावती-पंढरपूर या विशेष गाडीचे सायंकाळी ५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर आगमन झाले; मात्र पूर्वीप्रमाणे या गाडीला लाभणारा भाविक प्रवाशांच्या प्रतिसादात कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी केवळ ५१ प्रवासीच पंढरपूरला जाण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावरून या गाडीमध्ये चढले. दुसरी ठळक जाणवलेली बाब अशी, की अकोला रेल्वेस्थानकावर गाडीच्या आगमनापूर्वी तिच्या स्वागतासाठी अनेक पदाधिकारी व अधिकारी जमायचे. ढोल-ताशांच्या गजरात गाडीच्या इंजीनला हार-फुले वाहून, इंजीन ड्रायव्हर, गार्ड व प्रवाशाला निघालेल्या वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले जायचे; मात्र बुधवारी कोणतेच अधिकारी वा पदाधिकारी फिरकले नाही. याच गाडीने पंढरपूरला निघालेल्या अकोल्यातील विश्व वारकरी सेना महिला मंडळाच्या हभप प्रतिभा गिरी व दिलीप गिरी यांनी वेळेचे भान राखून इंजीन चालक व गार्डचे स्वागत केले.
‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसला भाविकांचा अल्प प्रतिसाद!
By admin | Published: June 29, 2017 12:54 AM