अकाेला : वऱ्हाडी भाषा समृद्ध व व्यापक होण्यासाठी वऱ्हाडी बोली शब्दकोश, म्हणकोश व वाक्प्रचार कोश मैलाचा दगड ठरेल, असे मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीच्या सभेत पार पडलेल्या सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते.
महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, लाेककवी डॉ. विठ्ठल वाघ व माजी विद्यार्थी डॉ. रावसाहेब काळे यांनी संपादित केलेल्या वऱ्हाडी बोली शब्दकोश, म्हणकोश व वाक्प्रचार कोशाचे प्रकाशन नुकतेच राज्य मराठी विकास संस्थेने मुंबई येथे मराठी भाषा दिनी केले. या कार्याची महाराष्ट्र सरकारने दखल घेतल्याबद्दल डाॅ. विठ्ठल वाघ व डाॅ. रावसाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, ॲड. गजानन पुंडकर, रामचंद्र शेळके, कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर, केशवराव गावंडे, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. एकनाथ उपाध्ये, प्रा. राजाभाऊ देशमुख, मा. शेषराव गावंडे, प्रकाशराव गावंडे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांची प्रमुख उस्थिती हाेती.
महाविद्यालय विकास समितीच्या सभेअंतर्गत इंग्रजी विभागातील ‘लँग्वेज लॅब’चे उद्घाटन हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रध्दा थोरात यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. भिसे यांनी मानले. महाविद्यालयाचा होत असलेला विकास महाविद्यालयातील सामूहिक कार्याचे यथोचित फळ आहे, असे डॉ. भिसे यांनी सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.