वाडेगाव : येथूनच जवळ असलेल्या तांदळी येथील शेतशिवरात मृग नक्षत्रात कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या कपाशीचे पीक शेतात बहरलेले आहे. कपाशी पीक दोन पात्यांवर असून, पिकावर वाणी किटकांनी हल्ला चढविला आहे. वाणी कपाशीचे पाने फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तांदळी येथील शेतकरी असलेले निवृत्ती बरडे यांनी त्यांच्या शेतात दोन ते तीन एक्कर क्षेत्रात मान्सूनपूर्व कपाशी पिकाची लागवड केली आहे. लागवडीपासून मशागत करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पीक वाचविण्यासाठी धडपड केली आहे. सध्या पीक बहरलेले असताना वाणी कीटक मोठ्या प्रमाणात पाने खाऊन फस्त करीत असल्याचे चित्र आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गतवर्षी बोंडअळीने कपाशीचे नुकसान झाले. यंदाही कपाशीवर सुरुवातीलाच वाणी किटकांचा हल्ला चढविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
---------------------
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज
वाडेगाव परिसरात असलेल्या नकाशी, देगाव, तामशी, धनेगाव, पिंपळगाव, चिंचोली गणू, हिंगणा, बेलुरा, तांदळी, दिग्रस, सस्ती, तुलंगा आदी शेतशिवारात वाणी किटकांपासून पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कायम असल्याची भावना शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
--------------------
मी कर्ज काढून शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली. खते, फवारणी आदींवर खर्च करूनही वाणी किटकांचा हल्ल्यात पीक फस्त होत आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.
-निवृत्ती डी, बरडे, तांदळी, शेतकरी.