अकोला, दि. २0- महापालिकेच्या २0 प्रभागातील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल. ८0 जागांसाठी संपूर्ण शहरातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून ५७९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदानाच्या माध्यमातून संबंधित उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतदान यंत्रात बंद केला जाईल. यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली असून, शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. याकरिता महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतर पालिका क्षेत्राच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला. शासनाने ३१ ऑगस्ट २0१६ रोजी महापालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. शहरालगतच्या १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा महापालिकेत समावेश झाला. प्रभागांची पुनर्रचना करताना २0 प्रभाग उदयास आले. प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यापूर्वी ३६ प्रभागांमधून ७३ सदस्य निवडून आले होते. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन भागामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळ कमालीचे विस्तारले आहे. २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया होत असून, विविध राजकीय पक्ष, अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार्या ५७९ उमेदवारांच्या निवडीचा फैसला मतदान यंत्रात बंद केला जाईल. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाच्यावतीने ५८७ मतदान केंद्रं निश्चित करण्यात आले आहेत. याठिकाणी मतदानासाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आदी व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे वोटरस्लीप देण्यात येत आहे. त्यासुद्धा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याकरिता पुरेशा असेल. परंतु, जर मतदार स्लिपवर फोटो नसेल तर मात्र ओळख दर्शविणारा योग्य ते कागदपत्रे मतदारांनी सोबत ठेवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर १00 मीटर अंतरावर राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांना बुथ उघडता येतील. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना माहिती देण्यासाठी उभारलेल्या मंडपात केवळ दोन व्यक्तींना (कार्यकर्ते) बसण्याची मुभा राहील. त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती !अकोला : आपल्या मतदारसंघात उभा असलेला उमेदवार कसा आहे, त्याचे शिक्षण किती, त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे दाखल आहेत, ही सर्व माहिती आता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर एका फलकावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना सर्वच उमेदवारांची मतदान करण्यापूर्वीच संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये उमेदवारांची सहा प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. ३३ शस्त्रे जमा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शहरातील शस्त्र परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र पोलीस मुख्यालयात जमा केले आहेत. ३३ वर शस्त्र परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र पोलीस दलाकडे सादर केले आहेत. शहरातील एकूण १८६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून यामधील २४ मतदान केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदानाला चला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 1:54 AM