अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाचही मतदार संघात सोमवारी मतदानाला सुरुवात झाली. अकोला : पाचही मतदारसंघांत निवडणूक रिंगणातील ६८ उमेदवारांचे भवितव्य १५ लाख ७७ हजार २५४ मतदार ठरविणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी १६.५८ टक्के मतदान झाल्याची माहीत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.यामध्ये अकोट - १७.१७ टक्के, बाळापूर - १७.११ टक्के, मुर्तीजापूर - १६.४६ टक्के, अकोला पश्चिम १५.९० टक्के, अकोला पूर्व - १६.४० टक्के मतदानाची नोंद झाली.
सकाळी सात वाजेच्या सुमारास मतदानास प्रारंभ झाला. सुरूवातील मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.९० टक्के मतदारांनी जिल्ह्यात मतदान केले होते. त्यानंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी होऊ लागल आहे. ग्रामीण भागात नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले होते तर शहरी भागात तुलनेने मतदानाचा टक्का तुर्तास तरी कमी आहे.