अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा तयारीचा आढावा घेतला. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ७० जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांची ९ पदे रिक्त राहणार आहेत. त्यानुषंगाने निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये २ हजार ३९५ महिला उमेदवार असून, २ हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
मास्क आवश्यक
निवडणुकीत मतदान करणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर सॅनियटाझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. निरोगी किंवा कोरोना संसर्ग नसलेल्या मतदारांचे मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत कोरोनाबाधितांना मतदान करण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्यांना मास्क आवश्यक आहे.
सोमवारी निकाल
ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर मतमोजणीची तयारी प्रशासनाने केली आहे. सोमवार १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
२२० संवेदनशील मतदान केंद्रे!
जिल्ह्यात ८५१ मतदान केंद्रांपैकी २२० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक ६० संवेदनशील मतदान केंद्रे असून बाळापूर ३६, पातूर ३४, अकोट २६, तेल्हारा २४, अकोला २१, मूर्तिजापूर १९ अशा केंद्रांचा समावेश आहे.
दक्षता पाळा, हक्क बजावा!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही ग्रामपंचायत निवडणूक सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. कोरोना नियमांचे पालन करून पूर्ण दक्षता घेत मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावावा. सर्वांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
- जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी, अकोला