राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायतची प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला व २ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. तथापि, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागाची व लोकसंख्येची विभागणी आणि आरक्षणाची विभागणी करावयास पाहिजे होती; परंतु तसे झाले नसल्याने, यासंदर्भात व्याळा येथील उत्तम गोविंदराव म्हैसने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणीनंतर १८ डिसेंबर रोजी आदेश पारित करण्यात आला. त्यात अर्जदार यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार अर्जदाराकडून राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आला. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य निवडणूक आयोगास अहवाल सादर करुन मार्गदर्शन मागविले होते. व्याळा ग्रामपंचायतची प्रभाग रचना सदोष असून, ती रद्द करणे आवश्यक असल्याने, व्याळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे आतापर्यंत पार पाडण्यात आलेले सर्व टप्पे रद्द करून नियमानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर रोजी दिले. त्यानुसार व्याळा ग्रामपंचायतची नव्याने प्रभाग रचना करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र कार्यक्रम देण्यात येणार आहे, तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत व्याळा ग्रामपंचायतची निवडणूक होणार नसून, या निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बाळापूर तहसीलदारांना दिला.
व्याळा ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:16 AM