वाडेगाव : येथील बिल्डिंग मटेरिअलचा व्यवसाय करणारे व्यावसायिक प्रशांत पोटदुखे यांना डिस्काऊंटचे आमिष दाखवून १३ लाख ५२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणात व्यावसायिक प्रशांत पोटदुखे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.
व्यावसायिक प्रशांत शिवलाल पोटदुखे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ब्लिडिंग मटेरिअल व्यवसाय करतात. दुकानासाठी लागणारे साहित्य ते जालना येथील कालिका स्टील येथून घेत होते. मागील दोन महिन्यांपासून त्यांनी माल घेणे बंद केले होते. त्यानंतर प्रशांत पोटदुखे यांनी कामधेनू, राजुरी स्टील येथील संपर्क हा ऑनलाईन पद्धतीने मिळविला. भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी संपर्क साधला असता साहित्य घेतल्यास सवलतीचा भाव देऊ असे सांगितले. त्यानंतर प्रशांत पोटदुखे यांच्या भ्रमणध्वनीवर कंपनीच्या बनावट भ्रमणध्वनीवरून बिल्डिंग मटेरिअलचे प्राईज लिस्ट व कोटेशन पाठविले. साहित्याचे भाव पटल्याने प्रशांत पोटदुखे यांनी दि. १४ सप्टेंबर रोजी विदर्भ कोकण बँकेतील त्यांच्या खात्यामधून आरटीजीएसद्वारे सुरुवातीला दोन लाख ८५ हजार, दुसऱ्यांवेळी चार लाख २८ हजार १०० रुपये पाठविले. त्यानंतर प्रशांत पोटदुखे यांना पैसे प्राप्त झाल्याची पावती पाठविण्यात आली. प्रशांत पोटदुखे यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी पुन्हा दोन लाख ५५ हजार ४०० व तीन लाख ८३ हजार १०० रुपये पाठविले. माल केव्हा मिळणार, अशी विचारणा केली असता पुन्हा डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखविले. व्यावसायिक प्रशांत पोटदुखे यांना लक्षात येताच त्यांनी अकोला येथील व्यावसायिकांकडे चर्चा केली. संबंधित कंपनीचे मोबाइल व खाते क्रमांक खोटे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, सायबर सेल यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत.