वाडेगाव : वाडेगाव-चिंचोली गणू रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेत रस्ता दुरुस्तीबाबत प्रस्ताव सादर केल्याची माहिती जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी दिली.
दोन वर्षांपासून वाडेगाव-चिंचोली गणू रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने परिसरातील चिंचोली गणू, तांदळी, पिंपळगाव, बल्हाडी, धाडी, तसेच वाडेगाव येथील नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करण्यासाठी अडचण येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने सादर केली. मात्र, सद्य:स्थितीत रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत रस्त्याच्या दुरवस्थेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाडेगाव-चिंचोली गणू रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याबाबतीत उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम शिक्षण आरोग्य व अर्थ समिती जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.
--------------------------------
वाडेगाव-चिंचोली गणू रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीसाठी संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी केली; परंतु कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
- प्रल्हाद डिगांबर गोतमारे,
सरपंच, चिंचोली गणू
--------------