वाडेगाव: येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेच्या मैदानात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळेचे मैदान काटेरी झुडुपांच्या विळख्यात सापडले असून, विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे. तसेच पावसाचे पाणी मैदानात साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मैदानामध्ये परिसरातील सांडपाणी, गुरे, भटके कुत्रे, डुकरांचा वावर असल्याने या मैदानावर फिरणेसुद्धा कठीण झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात शाळेची घंटा वाजण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची भीती आहे. त्यामुळे मैदानाची साफसफाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. (फोटो)
------------------------
मैदान बनले वाहनतळ
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गावातील सर्वच कार्यक्रम यामध्ये विवाह सोहळा, सत्कार सोहळा, सभा घेण्यात येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने तसेच कुठलेही कार्यक्रम न झाल्याने मैदानावर शुकशुकाट होता. दरम्यान, याचाच फायदा घेत काही नागरिक आपले वाहन मैदानात उभी करीत आहे. सद्यस्थितीत मैदान हे वाहनतळ बनल्याचे दिसून येत आहे.
-------------------
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाबाबत प्रशासन व संबंधित मुख्याध्यापकांना सूचना देण्यात येतील. मैदान स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार. लवकरच मैदानाची स्वच्छता करण्यात येईल.
-चंद्रशेखर चिंचोळकर, जि. प. सदस्य, वाडेगाव.
-------------------------------
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर अतिक्रमणाचा व घाणीचा विळखा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मैदानाची स्वच्छता करून विद्यार्थ्यांना खेळण्यास मोकळे करून द्यावे.
-सुश्रुत भुस्कुटे, युवक, वाडेगाव.