वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत शिकस्त झाली असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. शिकस्त इमारतीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जि.प. शाळेची नवीन दुमजली इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच रुपेश राठी यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, शाळेतील विद्यार्थी दोन वेगवेगळ्या इमारतीमध्ये शिक्षण घेतात. यापैकी ग्रामपंचायत कार्यालय जवळील इमारतींमध्ये उर्वरित वर्ग भरतात. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा परिषद शाळेची इमारत शिकस्त झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन जि. प. शाळेची नवीन दुमजली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
---------------------------
अपघाताची शक्यता वाढली!
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत शिकस्त झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न केल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
वाडी अदमपूर: शिवारातील पांदण शेतरस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात शेतकऱ्यांना नाहक त्रासाला समाेरे जावे लागते त्यामुळे पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच रुपेश राठी यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
वाडी अदमपूर-वानखेड, वाडी अदमपूर-जाफ्रापूर-वरूड वडनेर, वाडी अदमपुर-निभोंरा, वाडी अदमपुर-शेरी या शेतरस्तांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना खत बी-बियाणे ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे परिसरातील पांदण रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सरपंच रुपेश राठी, उपसरपंच मीना शेळके, ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई कोतकर, सुरेंद्र भोंगळ, विठ्ठल खारोडे, जितेंद्र जाधव, रजित बोदडे, साधना बोदडे यांनी केली आहे.