तेल्हारा पं.स. अंतर्गत असणाऱ्या वाडी अदमपूर येथील ग्रामस्थ शंकर भाकरे, रघुनाथ घोराळ, योगेश वरणकार, संजय खारोडे, गणेश सु.वाघ यांनी १५ सप्टेंबरपासून वाडी येथील घरकुलांच्या घोटाळ्याची चौकशी करून गरजूंना घरकूल मिळावे, यासाठी गावात उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची दखल प्रशासनाकडून होत नसल्याने भाजप युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे यांनी १७ सप्टेंबर रोजी उपोषण मंडपाला भेट दिली. ग्रामस्थांना धीर देत पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व पूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच प्रकरण मार्गी लावा, अन्यथा आंदोलनाचा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे शनिवारी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. यावेळी जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चौकशी समिती गठीत करून त्यात दोन गावकऱ्यांचा समावेश करण्याची विनंती यावेळी केली. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन पेढे व शरबत देत उपोषणाची सांगता केली. यावेळी भाजपा युवामोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशाल कोकाटे, डिगा पांडे, सागर भाकरे, अंकुश वाघ, सोनू तिव्हाणे, विक्की कुलट, शुभम चिंचोलकर, वाडी येथील ग्रामस्थ हे उपस्थित होते.
लेखी आश्वासनंतर वाडी ग्रामस्थांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:20 AM