बार्शिटाकळी : तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या मजूर वनकामगारांना मजुरीचा मोबदला म्हणून दिली जाणारी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा न करता रोख रकमेच्या स्वरूपात दिली जात असल्याची तक्रार दि. २६ जुलै रोजी वन मजुरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपवनसंरक्षक आदींकडे दिली आहे.
मजूर वन कामगारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ पासून वन विभागाच्या कोणतेही शासकीय कामे करणारे वनकामगारांना त्यांचे कामाचे मजुरीचे पैसे रोख स्वरूपात न देता वन कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचा शासनाचा आदेश असतानाही धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणारे वन कामगार संतोष हरीभाऊ जाधव यास वगळून सुनील बोंदिराम करवते, प्रकाश सखाराम जाधव, साहेबराव उत्तम गवई, इंद्रराज नामदेव सरकटे, गोविंदा पांडुरंग जाधव या मजूर वन कामगारांचे मजुरीचे पैसे कधी रोख रकमेच्या स्वरूपात, तर कधी बँक खात्यात वन विभागामार्फत जमा होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत या कामगारांना कायमस्वरूपी मजूर वनकामगार आहोत, किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. यापैकी गोविंदा पांडुरंग जाधव या मजूर वन कामगारावर अन्याय करून त्यांना कामावरून बंद केल्याचेही तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
-------------------------
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, कारवाई न झाल्यास दि. १ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारकर्ते मजूर वन कामगार सुनील करवते, प्रकाश जाधव, साहेबराव गवई, इंद्रराज सरकटे, गोविंदा जाधव, संतोष जाधव यांनी दिला आहे.
-------------------------
माझ्या कार्यकाळात वन परिक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मजूर वन कामगारास रोख रकमेच्या स्वरूपात मजुरीचा मोबदला दिला जात नाही. तक्रारीत केलेले आरोप खोटे आहेत.
-एस. जी. डांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा.( प्रा )
--------------
मजूर वनकामगारांना कार्यक्षेत्रात मजुरी केल्याचा मोबदला म्हणून कधी बँकेच्या खात्यात रक्कम जमा केली जाते, तर कधी कार्यालयातून रोख रकमेच्या स्वरूपात पैसे दिले जातात. याबाबत वरिष्ठांनी चौकशी करून न्याय द्यावा.
-प्रकाश जाधव, जिल्हाध्यक्ष, वन कामगार संघटना, अकोला.