पिंजर परिसरात माकडांचा धुडगूस
पिंजर : पिंजर परिसरात काही दिवसांपासून माकडांनी धुडगूस घातला आहे. पाण्याच्या शोधात माकडे गावात येत आहेत. गावातील घरांवर उड्या मारून माकडे अनेक घरांचे नुकसान करीत आहेत. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गहू, भुईमुगाचे पीक जोमात
खानापूर : खानापूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी गहू, भुईमूग पिकाची लागवड केली आहे. परिसरातील सिंचनाची सोय असल्याने, पिके चांगलीच बहरात आहेत. यंदा नापिकीने शेतकरी हतबल झाला आहे. या पिकांकडून शेतकऱ्यांना उत्पन्न होण्याची आशा आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव, नागरिक बिनधास्त
अडगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, नागरिक बिनधास्त वावरताना दिसत आहेत. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. विना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर होताना दिसत नाही. सायंकाळी गावातील पारावर गर्दी पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील धुळीने वाहनचालक त्रस्त
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी बाजूला सारली जात असल्याने धूळ उडत आहे. या धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.